विधानसभेसाठी भाजपाकडून जिल्हय़ात 29 जण इच्छुक

प्रतिनिधी/ रत्नागिरी

विधानसभेसाठी युतीची चर्चा सुरु असतानाच भाजपाकडून जिह्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात इच्छुकांच्या मुलाखती नुकत्याच पार पडल्या. यामध्ये 29 उमेदवारांच्या मुलाखतीं घेण्यात आल्या. या निवडणूकीसाठी युती निश्चित आहे मात्र गुहागर, चिपळूण या दोन मतदार संघात भाजपाचे वर्चस्व असल्याने या जागा भाजपाला मिळाव्यात अशी मागणी पक्षनिरीक्षक तथा प्रदेश सरचिटणीस आमदार सुरेश हळवणकर यांनी व्यक्त केली आहे.

विधानसभा निवडणूकीसाठी भाजपानेही रत्नागिरी व सिंधुदूर्ग या दोन्ही जिल्हय़ात मोर्चेबांधणीला प्रारंभ केला आहे. त्यासाठी उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ातील विधानसभा मतदार संघासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखातींचा कार्यक्रम हळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी येथील शासकीय विश्रामगृहावर झाला. यावेळी माजी प्रदेश सरचिटणीस बाळ माने, जिल्हाध्यक्ष ऍड. दिपक पटवर्धन, माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर आदींची उपस्थिती होती. जागा वाटपात जो मतदार संघ भाजपला मिळेल त्या मतदार संघात इच्छुकांमधून उमेदवार दिला जाणार असल्याचे हळवणकर यांनी सांगितले. त्यावेळी कोणीहि बंडखोरी करणार नसल्याची खात्री या मुलाखतींदरम्यान इच्छुकांनी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

रत्नागिरी जिह्यातील पाच विधानसभा मतदार संघातून या मुलाखतींसाठी 29 इच्छुकांनी हजेरी लावली होती. त्यामध्ये रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून विकास सावंत, दत्ता देसाई, अशोक मयेकर, सुभाष गराटे, डॉ. नहिदा शेख, राजेश मयेकर, कृष्णकांत उर्फ भाई जठार यांचा समावेश होता. चिपळूण विधानसभा मतदार संघातून माजी जि.प. अध्यक्ष रश्मी कदम, माजी सभापती निलम गोंधळी, चिपळूणच्या नगराध्यक्ष सौ. सुरेखा खेराडे, तुषार खेतले, विजय चितळे, प्रमोद अधटराव, रामदास राणे, घोसाळकर यांचा समावेश होता. गुहागर विधानसभा मतदार संघातून डॉ. विनय नातू, रामदास राणे, प्रशांत शिरगांवकर, दापोली विधानसभा मतदार संघातून केदार साठे, शशिकांत चव्हाण, आबा जोशी, राजापुर विधानसभा मतदार संघातून उल्का विश्वासराव, प्रसाद पाटोळे, ऍड. रुपेश गांगण, संतोष गांगण, अनिल कनगुटकर यांनी मुलाखती दिल्या आहेत.

या इच्छुक 29 जणांसह आणखी काही नावे पडद्यामागे असल्याचे सांगितले जात आहे. त्यामध्ये माजी आमदार बाळ माने, डॉ. विनय नातू, ऍड. दिपक पटवर्धन यांच्या नावांचीही चर्चा सुरू आहे. यावेळी डॉ. नातू यांची अनुपस्थिती होती. युतीमुळे कोकणात भाजपचे नुकसान झाल्याचे आमदार हळवणकर यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणूकीच्या रणसंग्रामला सामोरे जाताना पक्षाची सज्जता म्हणून भाजपने प्रत्येक विधानसभा मतदार संघात उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. त्यासाठी  इच्छुकांची मते जाणून घेण्यात येत आहेत. देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता प्रयत्न करणार आहे. जागा वाटपात जो मतदार संघ भाजपला मिळेल त्या मतदार संघातील इच्छुकांमधून उमेदवार दिला जाईल. प्रदेश पातळीवर जागा वाटपाचा निर्णय होणार असल्याचे आमदार हळवणकर यांनी सांगितले.