मुंबईत बलात्काराच्या आरोपाखाली मनसे कार्यकर्त्याला अटक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. टिळकनगर पोलिसांनी बलात्कार, हिंसाचार आणि धमकावल्याच्या आरोपाखाली अटकेची कारवाई केली आहे. सतीश वैद्य असं या कार्यकर्त्यांचं नाव असून तो चेंबूरमधील मनसेचा कार्यकर्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मनसे पक्षातील महिला कार्यकर्त्याने सतीश वैद्य याच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे.

पीडित महिलेने टिळकनगर पोलीस ठाण्यात यासंबंधी लेखी तक्रार दिली होती. पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर एफआयआर दाखल करुन घेतला होता. महिलेने केलेल्या आरोपानुसार, सतीश वैद्य याने आपल्याला ठाणे येथील एका हॉटेलमध्ये जेवण्याच्या बहाण्याने नेलं आणि तिथे नेऊन बलात्कार केल्याचा महिलेचा आरोप आहे.

यानंतर सतीश वैद्य याने धमकावलं असल्याचाही महिलेचा आरोप आहे. सतीश वैद्य याने जर आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पतीला घडलेल्या प्रकाराबद्दल सांगू अशी धमकी देत आपल्याला ब्लॅकमेल केल्याचंही महिलेने आरोपात सांगितलं आहे. पोलिसांनी सतीश वैद्य याला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.