ज्येष्ठ पत्रकार रशीद साखरकर यांचे निधन

28

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार व रत्नागिरी जिल्हा कॉंग्रेस कमिटिच्या अल्पसंख्यांक सेलचे कोकण विभाग समन्वयक रशीदभाई साखरकर (73) यांचे शुक्रवारी सकाळी 7.30 च्या सुमारास रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात निधन झाले.

50 वर्षाहून अधिक काळ रशीदभाई रत्नागिरीतील पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होते. येथील विविध वृत्तपत्रांतून ते वृत्तांकन करत असत. बातमी, संपादकीय लेखन, विशेष लेख याद्वारे येथील सामाजिक, राजकीय, शासकीय, निमशासकीय कर्मचारी, अधिकारी तसेच मच्छीमार, शेतकरी अशा विविध विषयांवर त्यांनी वृत्तांकन केले. विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता. अधिस्वीकृती समितीचे कोकण विभागीय अध्यक्ष, साखरतर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आदी पदांवर त्यांनी काम पाहिलेले होते. अन्यायाविरोधात परखड लिखाण करणारे पत्रकार अशी त्यांची ओळख होती.

मुळचे साखरतर येथील रशीद साखरकर हे  जानेवारीपासूनच आजारी होते. गुरुवारी त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.  शुक्रवारी दुपारी साखरतर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पत्रकार, सामाजिक, शैक्षणिक संस्थांमधील पदाधिकारी, काँग्रेस पक्षाच्या विविध सेलमधील पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.