पर्यटक मारहाणप्रकरणी न्यायालयीन कोठडी

19

वार्ताहर / सावंतवाडी:

आंबोली-कावळेसाद पॉईंट येथे पर्यटनासाठी आलेल्या सुकळवाड (मालवण) येथील पर्यटकांना मारहाण करून त्यांच्या अंगावरील दागिने चोरी केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेले बेळगाव-शिवबसवनगर येथील नऊजणांना येथील न्यायालयाने पंधरा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. संशयितातर्फे ऍड. नीलम राऊळ व ऍड. सचिन सावंत यांनी काम पाहिले.

3 जुलैला सुकळवाड येथील सीताराम पावसकर व अन्य त्यांचे मित्र वर्षा पर्यटनासाठी आंबोली कावळेसाद पॉईंट येथे गेले होते. त्यावेळी त्या ठिकाणी बेळगाव येथील पर्यटक खासगी बस करून आले होते. किरकोळ कारणातून दोन गटात वाद झाला. त्यावेळी बेळगावचे पर्यटक महेंद्र चौगुले, चरण लोंढे, सनी लोंढे, साईनाथ लोंढे, किशन लोंढे, अजय संजय लोंढे, प्रेम लोंढे, अल्ताफ चौगुले, अजय अजित लोंढे यांनी जमाव करून सुकळवाडच्या पर्यटकांना मारहाण करत त्यांच्या अंगावरील दागिने खेचून पलायन केले होते. पोलिसांनी तपास करून नऊजणांना अटक केली. तक्रारदार पावसकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सहा लाख 24 हजार रुपये किंमतीचे दागिने चोरीस गेले होते. तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश जाधव यांनी तपास करत संशयित आरोपीकडून 1 लाख 88 हजार रुपये किंमतीचे दागिने हस्तगत केले. संशयित नऊजणांना न्यायालयाने 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले असता पंधरा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. संशयितांना जामीन मिळावा, यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती संशयितातर्फे ऍड. सचिन सावंत यांनी दिली.