मलपी येथील ट्रॉलरला पकडले

वेंगुर्ले येथील समुद्रात बेकायदा मच्छीमारी : 28 हजाराच्या मासळीचा लिलाव

वार्ताहर / वेंगुर्ले:

वेंगुर्ले बंदरासमोरील सुमारे 12 वाव खोल समुद्रात बेकायदेशीररित्या मच्छीमारी करणाऱया मेंगलोर येथील ‘सीविंड’ नामक मोठय़ा मासेमारी ट्रॉलरला वेंगुर्ले मत्स्य खात्याचे परवाना अधिकारी यांच्या पथकाने गस्तीनौकेद्वारे पकडले. महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम 1981 च्या कायद्यांतर्गत वेंगुर्ले तहसीलदार यांच्या न्यायालयात कारवाईसाठी सोमवारी हे प्रकरण सादर करण्यात आले.

शनिवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास 12 ते 15 वाव खोल पाण्यात मेंगलोरमधील अनेक ट्रॉलर मच्छीमारी करीत होते. मालवण येथील मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ल्यांचे मत्स्य परवाना अधिकारी चिन्मय जोशी, सागरी सुरक्षा रक्षक हर्षद टाककर, राजेश कुबल, वेंगुर्ले पोलीस सागर भोई आदींनी गस्तीनौकेद्वारे हे ट्रॉलर गाठले. मेंगलोर येथील चार ते पाच ट्रॉलरांकडून या गस्ती नौकेवर दगडफेक करण्यात आली. हल्ला करून ते ट्रॉलर पळून गेले. मात्र 12 वाव समुद्राच्या पाण्यात जाळी टाकून मासेमारी करणाऱया ‘सीविंड’ नामक टॉलरला मत्स्य खात्याच्या पथकाने ताब्यात घेतले. वेंगुर्ले बंदरात आणल्यावर या ट्रॉलरने पकडलेल्या विविध स्वरुपाच्या मासळीचा लिलाव करण्यात आला. या मासळीचा 28 हजार रुपये किमतीचा लिलाव झाला. या प्रकरणी वेंगुर्ले मत्स्य खात्याचे परवाना अधिकारी चिन्मय जोशी यांनी मेंगलोर-मलपी ‘सीविंड’ ट्रॉलर नंबर आय. एन. डी.- के. ए. – 01 – एम. एम. 3224 चे मालक जोसेफ ओसवाल यांच्यावर येथील वेंगुर्ले तहसीलदार यांच्या न्यायालयात कारवाईसाठी प्रकरण सादर केले.