पत्नी, सासरा, मेहुणीवर जावयाकडून चाकू हल्ला

10

क्रांतीनगर येथील खळबळजनक घटना पत्नी माहेरी राहण्यास आल्याच्या रागातून कृत्य

रत्नागिरी / प्रतिनिधी

रत्नागिरी शहरातील किर्तीनगर येथे पतीच्या जाचाला कंटाळून माहेरी आलेल्या पत्नीसह सासरा, मेव्हणी यांच्यावर जावयाने धारदार चाकूने सपासप वार केले. तिघांचही प्रकृती गंभीर असून त्यांना अधिक उपचारार्थ कोल्हापुर येथे हलवण्यात आले आहे.  मंगळवारी रात्री  9.30 च्या सुमारास किर्तीनगर येथे घडली.घडलेल्या या घटनेने शहर परिसरात खळबळ उडाली आहे.

यासिन गफूर मुजावर (52, किर्तीनगर रत्नागिरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार   रिजवान इलियाज हमदारे (रा. रॉयल कॉम्प्लेस, अजमेरीनगर, रत्नागिरी, मूळ भुसारवाडा, पावस) याला संशयित म्हणून अटक करण्यात आली आहे.

संशयित आरोपीची पत्नी आशिया हमदारे पती रिजवान यांच्या मानसिक जाचाला कंटाळून गेल्या 15 दिवसांपासून माहेरी किर्तीनगर येथे आली होती.  वारंवार बोलावूनही पत्नी घरी परत येत नसल्याने संतप्त झालेला रिजवान याबाबतचा जाब विचारण्यासाठी किर्तीनगर येथे पोहचला. त्याने मुजावर कुटुंबियांना पत्नीला घरी पाठवण्याची विनंती केली. परंतु त्याच्या वागण्याला कंटाळलेल्या पत्नीने सासरी जाण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला.

त्यामुळे राग अनावर झालेल्या रिजवान याने त्रागा केला. यातून सासरच्या मंडळींसोबत त्याची जोरदार बाचाबाची झाली. या रागातून बेभान झालेल्या रिजवान याने आपला सासरा गफुर मुजावर, मेहुणी नाझिया वाईकर तसेच पत्नी आशिया यांच्यावर धारदार चाकूने सपासप वार केले. यामध्ये तिघेही जखमी झाले.  रक्ताच्या धारोळ्यात पडलेल्या गफूर, नाझिया आणि संशयिताची पत्नी आशिया या तिघांना शेजारी व नतोवाईकांनी रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केली. मात्र, तिघेही गंभीर जखमी असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले.

या घटनेची खबर सासू यासिन मुजावर यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत संशयितावर गुन्हा दाखल करत बुधवारी सकाळी त्याला अटक केली.