महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने?

10

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा जो पेच निर्माण झाला आहे तो सुटायचं नाव घेत नाहीये. कारण महायुतीला जनमताचा कौल मिळाला असला तरीही शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावर अडीच वर्षांसाठी दावा सांगितला. तर भाजपाला शिवसेनेची ही अट मान्य नाही. त्यामुळे आता पुढे काय होणार? हा प्रश्न संपलेला नाही. दरम्यान शिवसेना जरी वेट अँड वॉचच्या भूमिकेत असली तरीही आता भाजपानेही हीच भूमिका घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने सुरु आहे असे सूत्रांनी म्हटले आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार भाजपाही सरकार स्थापनेसाठी दावा करणार नाही. असं घडल्यास राष्ट्रपती राजवट लागू शकण्याची चिन्हं आहेत.

२४ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यानंतर १२ दिवस उलटूनही भाजपाने सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. भाजपाला निवडणुकीत १०५ जागांवर विजय मिळाला तर शिवसेनेला ५६ जागांवर विजय मिळाला. अशात भाजपा आणि शिवसेना युतीला जनतेने कौल दिला आहे. मात्र या दोन्ही पक्षांमधली चर्चा मुख्यमंत्रीपदाच्या वाट्यावरुन थांबली आहे. सर्वात मोठा पक्ष ठरुनही भाजपाने सत्तास्थापनेसाठी दावा केलेला नाही कारण शिवसेनेने चर्चेची दारं बंद केली आहेत असं भाजपाचं म्हणणं आहे. त्यामुळे आता शिवसेनेप्रमाणेच भाजपाही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. सगळं काही समसमान हे आमचं आधीच ठरलं आहे त्यामुळे शिवसेनेला अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद आणि सत्तेत समान वाटा हवा ही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान भाजपाने १६ मंत्रिपदांची ऑफर दिल्याचंही वृत्त आहे. मात्र युती म्हणून कोणतीही चर्चा पुढे सरकलेली नाही.

दरम्यान महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला विरोधात बसण्यासाठी कौल दिला आहे असं शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांनी म्हटलं आहे त्यामुळे ते विरोधात बसणार हे उघड आहे. राष्ट्रवादीने तर विधीमंडळ नेतेपदी अजित पवारांची निवडही केली आहे. असं असलं तरीही शिवसेना आणि भाजपाचं काही ठरताना दिसत नाहीये. त्यामुळे राज्याची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने सुरु आहे असंच राजकीय वर्तुळातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. भाजपा चर्चेसाठी तयार आहे मात्र शिवसेना नाही त्यामुळे भाजपा सत्तेसाठी दावा करणार नाही अशी माहिती सूत्रांकडून कळते आहे.