आंगणेवाडी भराडी देवीची यात्रा 17 फेब्रुवारीला

23

मसुरे: प्रतिपंढरपूर म्हणून दक्षिण कोकणात ओळखल्या जाणाऱया व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीची यात्रा 17 फेब्रुवारी रोजी होणार आहे. आंगणेवाडी यात्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते. देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस ठरविण्यात येतो. यावेळी भराडी मातेचे दर्शन अवघ्या 15 ते 20 मिनिटात होणार असून तशा पद्धतीचे अनोखे नियोजन आंगणे कुटुंबियांनी केले  आहे. राजकीय, उद्योजक, सामाजिक, कला, क्रीडा, पोलीस अशा विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थिती दर्शवितात.

आंगणेवाडीत येणारे लाखो भाविक देवीच्या दर्शनाची आस घेऊन येतात. वस्त्रालंकारांनी सजविलेली देवीचे रुप ‘याची देही याची डोळा’ पाहून जीवनाचे सार्थक झाल्याचा अनुभव भाविकांना या ठिकाणी येतो. लाखो भाविकांना केंद्रबिंदू मानून कोणत्याही प्रकारची गैरसोय न होता भाविकांना भराडी मातेचे दर्शन होण्यासाठी आंगणे कुटुंबीय मेहनत घेत असल्याची माहिती मुंबई मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे तसेच स्थानिक मंडळाचे अध्यक्ष नरेश आंगणे यांनी दिली. या यात्रोत्सवाला मोठय़ा प्रमाणात चाकरमानी उपस्थिती दर्शवितात. आंगणेवाडी यात्रेची तारीख निश्चित झाल्यानंतर रेल्वे तसेच खासगी बसेसचे आरक्षण करण्यासाठी भाविकांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे.

यात्रेसाठी जादा रेल्वेगाडय़ा सोडण्याची मागणी

शिवसेना आणि या यात्रेचे मोठे नाते आहे. आता राज्यात महाविकास आघाडीची सता आल्याने आघाडीचे बहुतांश मंत्री आणि आमदार हजेरी लावणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार असल्याचे समजते. यात्रेची तारीख सकाळी जाहीर होताच नेहमीप्रमाणे रेल्वे बुकिंग फुल झाल्याने अनेक चाकरमानी वेटिंगवर आहेत. त्यावेळी रेल्वे प्रशासनाने यात्रा कालावधीत जादा रेल्वे सोडाव्यात आणि त्यापूर्वी वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणीही होत आहे.