नापणे धबधब्याच्या कामाची वर्क ऑर्डर मिळूनही कंत्राटदाराची पाठ

13

मुंबई – (प्रतिनिधी ) निसर्गाचा अदभूत चमत्कार समजला जाणाऱ्या वैभववाडी तालुक्यातील नापणे धबधब्याच्या पायाभूत विकास कामासाठी एमटीडीने वर्क ऑर्डर देऊन एक महिना उलटला तरी काम सुरु न झाल्याने पर्यटन प्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
पर्यटकाना वेड लावणारा वैभववाडी तालुक्यातील नापणे धबधबा गेली कित्येक वर्षे पायाभूत सुविधांपासून दुर्लक्षित राहिला आहे.या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना सुविधा नसल्याने पर्यटक नाराज होऊन परत जातात.
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नाने नापणे धबधब्याला चांदा ते बांदा या योजनेतून 70 लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन तो एमटीडीसीला अदा करण्यात आला आहे.त्यानंतर हे काम लालफितीत अडकले होते.अखेर एमटीडीसीने निवडणुकीपूर्वी टेंडर प्रक्रिया पार पाडली.त्यानंतर सदर कंत्राटदाराला ७ डिसेंबरला वर्क ऑर्डर (कार्यारंभ आदेश) देण्यात आले आहेत.
कंत्राटदाराने ३ टक्के लो टेंडर भरल्याने ६८ लाख रुपयांचे टेंडरचे काम मंजूर झाले आहे.पायऱ्या बांधणे,स्ट्रीट लाईट,बसायला आसने, रेलिंग इत्यादी कामे या निधीतून होणार आहेत.नाशिक मधील एका कंत्राटदाराला हे काम मिळाले असून वर्क ऑर्डर मिळूनही काम सुरु करायला विलंब झाल्याने पर्यटन प्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.