जिल्ह्यातील पत्रकार व वृत्तपत्र वितरकांना कोणीही अडवणार नाही पालकमंत्री, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांची ग्वाही = गणेश जेठे

51

सिंधुदुर्गनगरी  / प्रतिनिधी
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा बजावणार्‍या पत्रकार व वृत्तपत्र वितरकांना यापुढे कोणीही अडवणार नाही, अशी ग्वाही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि पोलीस अधीक्षक दीक्षीतकुमार गेडाम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
वृत्तपत्रे ही अत्यावश्यक सेवा म्हणून सरकारने जाहीर करून वृत्तपत्र सुरू राहावी यासाठी पुढाकार घेतला होता. त्यानंतर वृत्तपत्र सुरू झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांना पोलिसांकडून अडविले जाऊ लागले होते, याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांनी जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क साधून पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते, पायलट, पेपर टॅक्सी चालकांना अडविले जाऊ नये अशी मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी पोलिसांना सूचना देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्यानंतरही काही पोलिसांकडून काही ठिकाणी पत्रकारांना अडविण्याचे प्रकार सुरू झाले होते. त्यामुळे गणेश जेठे यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक तसेच जिल्हा माहिती अधिकारी यांना पत्र पाठवून पत्रकारांना अडविले जाऊ नये अशी मागणी केली होती. बुधवारी सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार परिषदेत मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे, लवू म्हाडेश्वर व इतर पत्रकारांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. पत्रकारांना व विक्रेत्यांना अडविले जावू नये अशी मागणी केली. त्यानंतर यापुढे ज्या पत्रकारांकडे आयकार्ड आहे त्या पत्रकारांना व वृत्तपत्र वितरकांना अडविले जाणार नाही असे पालकमंत्री व जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान बुधवारी सावंतवाडी येथेही आयकार्ड असतानाही काही पत्रकारांना अडविण्यात आले होते, याबाबत सावंतवाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय देसाई, सचिन रेडकर यांनी गणेश जेठे यांच्याकडे तक्रार मांडली होती. सावंतवाडीतील पत्रकारांनी सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची भेट घेतली. त्यांनीही यापुढे पत्रकार व वितरकांना अडविले जाणार नाही असे स्पष्ट केले आहे. दोडामार्ग येथील पत्रकार संदीप देसाई यांच्याशीही पोलिसांनी चुकीच्या शब्दात संवाद साधला. तसेच कुडाळ येथील पत्रकार राजन नाईक यांनीही कुडाळ पोलिस स्थानकात आपल्याला अवमानकारक वागणूक देण्यात आली अशी तक्रार मांडली असून जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी यात लक्ष घालून संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांनी केली आहे. यापुढे ज्या पत्रकारांना व वृत्तपत्र वितरकांना अडविले जाईल अशांनी तात्काळ आपणाशी तसेच जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी व तालुका अध्यक्षांशी संपर्क साधावा असे आवाहनही श्री. जेठे यांनी केले आहे.