करुळ घाट खचला;घाटात मुसळधार पाऊस सुरुच…

9

वैभववाडी /प्रतिनिधी:-

मुसळधार पडणाऱ्या पावसात करुळ घाट मोठ्या प्रमाणात खचला आहे. रस्ता खचल्याने मार्गावरुन एकेरी वाहतूक सुरू आहे. घटनास्थळी वैभववाडी पोलीस दाखल झाले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा घाट मार्ग बंद करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गेली दोन दिवस तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाचा मोठा फटका करुळ घाटाला बसला आहे. दरीकडील भाग कोसळला आहे. ही घटना सोमवारी सकाळी घडली आहे. पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पो. हेड काँन्स्टेबल राजू जामसंडेकर, पोलीस नाईक मारुती साखरे, पोलीस नाईक गणेश भोवड घटनास्थळी दाखल झाले आहेत.मोरी असलेल्या ठिकाणी ठिकाणी रस्ता खचला आहे. साईड पट्टी चा भाग दरीत कोसळला आहे. घाट मार्ग खचल्याची माहिती वाहन चालकांना करुळ चेक नाक्यावरील पोलीस व गगनबावडा पोलीस देत आहेत. या मार्गावरुन एकेरी वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे.