कळसुली वनभागात वनविभाग कर्मचाऱ्यांनी घातली गस्त; बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणी…

कणकवली/प्रतिनिधी:-

कळसुली येथे वाढलेल्या बिबट्याच्या वावरामुळे कळसुलीवासिय रात्रंदिवस भीतीच्या छायेखाली जगत आहेत. त्यामुळे भयभीत झालेल्या कळसुलीवासियांनी काल दि. ३१ आॕगस्ट रोजी दिगवळे वनपाल तानाजी दळवी यांना निवेदन दिले होते आणि या बिबट्याला जेरबंद करण्यात यावे, अशी मागणी केली होती. या निवेदनाची दखल घेत दिगवळे वनपाल तानाजी दळवी, कळसुली वनरक्षक श्री. गळवे, नरडवे वनरक्षक श्री. शिंदे यांनी कळसुली सुद्रीकवाडी येथे जाऊन ग्रामस्थांची भेट घेतली व ग्रामस्थांकडून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांच्या सुचनेनुसार वनपाल तानाजी दळवी यांच्या नेतृत्वाखाली कळसुली वनविभागात गस्त घालण्यात आली.

गेल्या एका महिन्यात तब्बल चार पाळीव कुत्र्यांचा चक्क घरासमोरील अंगणातून घेऊन जात बिबट्याने फडशा पाडला आहे. दिंडवणेवाडी, सुद्रीकवाडी येथे बिबट्याचा वावर वाढत आहे. वनाधिकाऱ्यांनी यावेळी परिस्थितीचा आढावा घेतला असता ग्रामस्थांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी केली. यावेळी नंदकिशोर सुद्रीक, श्रीरंग सुद्रीक तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.