भटक्या विमुक्तांच्या योजना युद्धपातळीवर राबविणार- बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार…

22

मुंबई/प्रतिनिधी:-

राज्यातील भटक्या विमुक्त समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी महत्वूपर्ण योजना प्राधान्याने राबवाव्यात, या समाजाचे सामाजिक आर्थिक सर्वेक्षण तातडीने करावे,या समाजाच्या विकासासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करावी अशा सूचना केंद्रिय भटक्या विमुक्त कल्याणकारी बोर्डाचे अध्यक्ष भिकु (दादा) इदाते यांनी केल्या. भटक्या विमुक्तांच्या विकासासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत असल्याची माहिती यावेळी बहुजन कल्याण विभाग, खार जमीन विकास आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बैठकीत दिली.

राज्यातील भटके विमुक्तांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयातील दालनात केंद्रिय भटक्या विमुक्त कल्याणकारी बोर्डाचे अध्यक्ष दादा इदाते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला सचिव इंद्रा मालो, भटक्या विमुक्त कल्याणकारी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी.एस.वर्मा, डॉ.मनीष गवई, राजेंद्र भोसले यासह इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

अध्यक्ष श्री.इदाते म्हणाले, राज्य शासनाकडून भटक्या विमुक्तांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांना गती देण्यात यावी. या समाजाच्या विकासासाठी केंद्र शासनाला जे प्रस्ताव पाठविले आहेत त्यांना मंजुरी देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल. भटक्या विमुक्तांसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून या समाजाच्या विकास योजनांचा आढावा व अंमलबजावणी करण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे. राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची तपशीलवार माहिती यावेळी श्री.इदाते यांनी घेतली.