शाळा सुरू होणार पण…..ह्या आहेत शिक्षण विभागाच्या सुचना…

6

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:-

जिल्ह्यातील शाळामधील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग व शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग ४ ऑक्टोबर पासून चालू करण्यास शिक्षण विभागाने मान्यता दिली असून त्या संबंधीचे आदेश जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी सुनील मंदुपकर यांनी शुक्रवारी सायंकाळी काढले आहेत. आदेश झाले असले तरी प्रत्यक्षात शाळा सुरू होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची संमतीपत्रे शाळांनी घेणे आवश्यक असल्याने शाळेत प्रत्यक्ष पालक सभा झाल्या नंतरच घंटा वाजणार आहे. दरम्यान यापूर्वीच दहावी व बारावीचे वर्ग चालू झाले असल्याने कोरोनाच्या मुळे मोठ्या ब्रेक नंतर येत्या आठवडा भरात शाळा विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या दिसून येणार आहेत.

याबाबत पालक व शाळा याना वेगवेगळ्या मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाच्या आदेशात नमूद करण्यात आल्या आहेत.

कोरोना प्रतिबंध विषयक सर्व बाबी पालन करत शाळा सुरु करणे आवश्यक आहे.यात शाळा व्यवस्थापन समिती पालक सभा घेऊन शाळा सुरु करणेसंदर्भात पूर्वकल्पना देणे व विदयार्थ्याची कोविड संदर्भातील घ्यावयाच्या दक्षतेबाबत पालकांना माहिती दयावयाची आहे. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे प्राधान्याने लसीकरण पूर्ण करावे. एका वर्गात एका बेचवर एक विध्यार्थी, एका वर्गात जास्तीत जास्त 20 से 30 विदयार्थी असावेत.शाळा स्वच्छतेसाठी उपाययोजना करण्यात याव्यात, विदयार्थ्यांना हात धुण्यासाठी ग्रामपंचायतीच्या मदतीने सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

बसेस ऑटोमध्ये मुलाची गर्दी होऊ नये यासाठी काय व्यवस्था करावी हे शाळा व्यवस्थापन समितीने ठरवावे.ज्या शाळांमध्ये स्कुलबस खाजगी वाहनावारे विदयार्थी येतात. अशा वाहनामध्ये एका सीटवर एकच विदयार्थी बसून प्रवास करेल याची दक्षता घेण्यात यावी.विदयार्थी बसमध्ये चढताना व उतरताना विध्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वाहन चालक वाहक यांनि विद्यार्थ्यांनी सॅनिटायझरचा वापर करण्यास प्रोत्साहित करावे. घरात तयार केलेले मास्क वापरणे. सुरक्षित शारीरिक अंतर ठेवणे ज्या ठिकाणी वारंवार हात लावले जातात उदा. दरवाजे, हँडला. त्यांना स्पर्श न करणं स्वच्छता माहिती विदयार्थ्याना द्यावी.

मुलांनी स्वतःची बॅग पुस्तके, पाणी बॉटल, पेन, पेन्सिल इत्यादी शैक्षणिक साहित्यशाळेत येताना बरोबर घेऊन येण्याबाबत सूचना द्यायच्या आहेत. सदय:स्थितीत कोणत्याही प्रकारचे खेळ घेण्यात येऊ नयेत. कोरोना विषयक परिस्थिती सर्वसामान्य झाल्यानंतर काही खेळ घेण्यास हरकत नाही.

मोठया पटसंख्या असलेल्या शाळांतील विदयाथ्यांमध्ये सुरक्षित शारीरिक अंतर राखणे याकरीता शाळा दोन सत्रात सुरू करणे एक सत्र जास्तीत जास्त 3 तासाचे करावे लागणार आहे. वेगवेगळया वर्गाच्या विदयार्थ्यांनी एक दिवस सोडून अदलाबदलीने शाळेत यावे. मंगळवार गुरुवार व शनिवार वर्ग 7 व 8 असे वर्ग सुरु करावेत. पटसंख्या भौतिक साधनांची उपलब्धता, शाळा व्यवस्थापन समिती स्थानिक प्रशासन व पालक यांच्या समन्वयाने शाळेची वेळ तसेच आवश्यक असेल तर दोन सत्रामध्ये शाळा किंवा एक दिवसाआड शाळा भरविणेबाबत निर्णय घ्यावयाचा आहे.

कोविड होऊन गेलेल्या विदयार्थ्याशी सर्वसामान्य विदयाथ्यांप्रमाणे वागवावे. विदयार्थी पालकांशी ऑनलाईन ऑफलाईन पध्दतीने संपर्कात राहणे आवश्यक आहे.मुलांना मोबाईलची सवय लागू नये अशा पध्दतीने पालकांनी लक्ष ठेवण्याबाबत पालकांना मार्गदर्शन करावयाचे आहे. युनिफॉर्मची सक्ती करू नये. अशा एकूण सदतीस सूचना या आदेशात समाविष्ट आहेत.