नांदगाववासीयांचे ४ ऑक्टोबर रोजी नांदगाव तिठा ब्रिजखाली ठिय्या आंदोलन…

कणकवली/प्रतिनिधी:-

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण राहिलेली कामे तसेच अतिवृष्टीने होत असलेल्या नुकसानीबाबत नांदगाव वासीयांमार्फ़त अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याकरीता २३ जुलै रोजी हायवे प्रशासनाला पत्र देण्यात आले होते. परंतु या विषयाबाबत कोणतीही पूर्तता न झाल्याने तसेच कोणतेही लेखी पत्र न मिळाल्याने ग्रामस्थांच्या तक्रारी ग्रा. पं. कडे येत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांच्या या मागण्यांकडे संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी उद्या दि. ४ ऑक्टोबर, २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता नुकसानग्रस्त ग्रामस्थ व गावातील ज्येष्ठ नागरिकांसह नांदगाव तिठा ब्रिजखाली ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा सरपंच आफ्रोजा नावलेकर यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी यांना दिला आहे.

तसेच याबाबतची प्रत कणकवली तहसीलदार, कणकवली पं. स. सभापती, सार्व. बांध. विभाग रत्नागिरी, सार्व. बांध. विभाग खारेपाटण, कणकवली पोलीस निरीक्षक तसेच के. सी. सी. कंपनी ला पाठविण्यात आली आहे.