मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळातर्फे बाबासाहेब पुरंदरेंच्या स्मरणार्थ शोकसभेचे आयोजन; सर्व पक्षीय नेते, सामाजिक संस्था, कलाकार यांनी उपस्थित राहावे – परशुराम उपरकर…

34

कणकवली/प्रतिनिधी:-

छ. शिवाजी महाराजांचे चरित्र आपल्या खुमासदार शैलीत महाराष्ट्रभर पोहोचविणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे रविवारी वयाच्या शंभराव्या वर्षी दुःखद निधन झाले. बाबासाहेबांचं सिंधुदुर्ग जिल्ह्यावर खूप प्रेम होतं. त्यांच्या निधनाने जिल्हावासीयांना दुःख झाले असून मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळामार्फत बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवार २१ नोव्हेंबर रोजी कणकवली मराठा मंडळ सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, ‘जाणता राजा’ नाटकात काम करणारे सर्व कलाकार, सामाजिक संस्था तसेच बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मनसे सरचिटणीस तथा मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक परशुराम उपरकर यांनी केले आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शिवकालीन इतिहास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शाळांना व्याख्यानाच्या माध्यमातून पोहोचवला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दर्यावर्दी, येथील मावळ्यांचे स्वराज्याच्या निर्मितीत मोठे योगदान आहे, असे बाबासाहेब सांगायचे. त्यांच्या ‘जाणता राजा’ या महानाट्याचे जिल्ह्यात मोठे प्रयोग झाले. त्यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यावर विशेष प्रेम होते. मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळाचे ते अध्यक्षदेखील होते. त्यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कलादालन उभारण्याचा आमचा प्रयत्न होता. परंतु कोरोनाच्या कारणास्तव ते लांबणीवर पडलं. त्यासाठीच गेल्या २३ ऑक्टोबर रोजी त्यांची सहकुटुंब भेट घेतली होती. त्यावेळी बाबासाहेब पुरंदरेंनी दिवाळी नंतर कलादालनाचे काम करायला मी सिंधुदुर्गात येईन, असे आश्वासन दिले होते. परंतु त्यानंतर त्यांचा अपघात झाला आणि पंधरा दिवसांत त्यांचं निधन झालं. त्यामुळे बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतींना वंदन करण्यासाठी २१ नोव्हेंबर रोजी शोकसभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शोकसभेला जिल्ह्यातील सर्व पक्षीय कार्यकर्ते, सामाजिक संस्था, ‘जाणता राजा’ नाटकातील कलाकार आणि बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन परशुराम उपरकर यांनी केले आहे. यावेळी मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक संतोष सावंत, अनिल कुलकर्णी, चंद्रशेखर उपरकर, सचिव नितीन तळेकर आदी उपस्थित होते.