स्वच्छ सर्वेक्षणाच्या राष्ट्रीय पुरस्कारांवर कोकण विभागातील महापालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींनी उमटविली मोहोर…

8

ठाणे/प्रतिनिधी:-

स्वच्छ सर्वेक्षणाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक पुरस्कार मिळाले असून कोकण विभागातील ठाणे, नवी मुंबई, पनवेल या महापालिकांनी तर कर्जत, खेड, खोपोली, कुळगाव-बदलापूर या नगरपरिषदांनी आणि मुरबाड, शहापूर या नगरपंचायतींनी विविध गटातील राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे. मोठ्या लोकसंख्येच्या शहरांमध्ये देशातील प्रथम क्रमांकाचे सर्वोत्तम स्वच्छ शहराचा पुरस्काराने नवी मुंबईला गौरविण्यात आले आहे.

विभागातील महापालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या याकामाची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच रायगडच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी यंत्रणेचे अभिनंदन करीत नागरिकांचे आभार मानले आहेत.

नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे काल केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास मंत्रालयाच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण-२०२१ चे राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा झाला. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास मंत्री हरदिप सिंग पुरी, केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास राज्यमंत्री कौशल किशोर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. यावेळी राष्ट्रीय स्तवरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांना, नगरपालिकांना, लष्करी छावण्यांना राष्ट्रपती यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पुरस्कार आणि महापालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींची नावे अशी…

अमृत “स्वच्छ शहर” पुरस्कार : नवी मुंबई महानगरपालिका,  पनवेल महानगरपालिका तसेच खोपोली नगरपरिषद

कचरामुक्त शहरांचे  स्टार मानांकन…

अमृत-कचरामुक्त शहरांचे प्रमाण‍ित ३ स्टार मानांकन पुरस्कार : नवी मुंबई महानगरपालिका, ठाणे, पनवेल महानगरपालिका आणि कुळगांव-बदलापुर  नगरपरिषद
नॉन अमृत कचरामुक्त शहरांचे प्रमाणित ३ स्टार मानांकन पुरस्कार : कर्जत नगरपरिषद, खोपोली आणि खेड नगरपरिषद तसेच मुरबाड आणि शहापूर नगरपंचायत.

पुरस्कारांवर महाराष्ट्राचीच मोहोर…

आज झालेल्या पुरस्कार वितरणामध्ये एकूण पुरस्काराच्या ४० टक्के पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत. वन स्टार मानांकनामध्ये देशभरातील एकूण १४७ शहरांचा समावेश  आहे. यामध्ये राज्यातील ५५ शहरे आहेत. थ्री स्टार मानांकनामध्ये देशभरातील एकूण १४३ शहरे आहेत, त्यात महाराष्ट्रातील ६४ शहरांचा समावेश आहे. फाईव स्टार मानांकनामध्ये देशभरातील ९ शहरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, त्यामध्ये राज्यातील नवी मुंबई शहराचा समावेश आहे. नवी मुंबई महानगरपालिकेला ६ कोटी रूपयांचा धनादेश बक्ष‍िस स्वरूपात प्रदान करण्यात आला. दहा लाख लोकसंख्यावरील शहरांमध्ये देशभरातील एकूण  ४८ शहारांची निवड करण्यात आली होती, त्यात राज्यातील १० शहरांचा समावेश आहे. एक ते दहा लाख लोकसंख्या असणाऱ्‍या १०० शहरांमध्ये राज्यातील २७ शहरांचा समावेश आहे. एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्‍या १०० शहरांमध्ये राज्यातील ५६ शहरे आहेत तसेच यामध्ये पहिली वीस शहरे ही महाराष्ट्राचीच आहेत.

स्वच्छ सर्वेक्षणाच्या एकूण कामगिरीसाठी देशातील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्राला देण्यात आला असून राज्याचे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी स्विकारला. त्यांच्यासमवेत राज्य स्वच्छता मिशन (नागरी) अभियान संचालक अनिल मुळे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.