महाराष्ट्रातील घटनेची निवृत्त न्यायमूर्तीच्या मार्फत चौकशी करा, रझा अकादमीवर बंदी घाला; कणकवली तालुका भाजपाची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी…

कणकवली/प्रतिनिधी:-

त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसताना जगात कोठे तरी मशिदीची नासधूस झाल्याची क्लिप व्हायरल झाल्याने महाराष्ट्रात मालेगाव, अमरावती व नांदेड येथे नुकत्याच दंगली झाल्या. पंधरा हजार ते चाळीस हजार लोकांचे जमाव रस्त्यावर उतरून दुकाने, कार्यालये, गाड्या यांचा विध्वंस केला गेला. याचा भारतीय जनता पार्टी निषेध करते. असे सांगत कणकवली तालुका भाजपाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे, जमावाने केलेल्या हिंसाचाराची उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणून प्रामुख्याने अमरावतीमध्ये लोक रस्त्यावर उतरले. ते कोण्या एका पक्षाचे नव्हते व कोणी त्यांचे नेतृत्व करत नव्हते. स्वसंरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरही हल्ले केले गेले. त्यानंतर पोलीस यंत्रणेकडून पक्षपाती पद्धतीने कारवाई केली जात आहे.

अफवा पसरवून दंगल करणाऱ्यांना पाठीशी घालून स्वसंरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या सामान्य लोकांना मात्र पोलिसांकडून लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे या संदर्भात भाजपच्या वतीने काही मागण्या मुख्यमंत्र्यांकडे तहसीलदारांद्वारे करण्यात आल्या.

त्रिपुरा येथे न घडलेल्या घटनेच्या आधारे मालेगाव, अमरावती व नांदेड येथे अफवा पसरवून व धार्मिक भावना भडकवून दंगल घडविण्याच्या घटनेच्या आधारे मालेगाव, अमरावती व नांदेड येथे अफवा पसरवून व धार्मिक भावना भडकवून दंगल घडविण्याच्या प्रकाराची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीच्या मार्फत झाली पाहिजे.

ही दंगल घडविणाऱ्या सूत्रधारांना व त्यांच्या समर्थकांना अटक केली पाहिजे, दंगलीत हात असलेल्या रझा अकादमीवर बंदी घातली पाहिजे, स्वसंरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरील कारवाई बंद करावी. भारतीय जनता पार्टीच्या नेते – कार्यकर्त्यांवरील पूर्वग्रहदूषित कारवाई थांबवावी आणि त्यांच्याविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत. अशा मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

तहसीलदारांकडे निवेदन देताना सभापती मनोज रावराणे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे, उपसभापती प्रकाश पारकर, हर्षदा वाळके, प्रज्ञा ढवण, सुभाष मालंडकर गणेश तळगावकर, संतोष पुजारे, शशि राणे, लक्ष्मण गावडे सुदर्शन राणे, नितीन पाडावे, अण्णा कोदे, समर्थ राणे, महेश गुरव, सदा चव्हाण, सुशील सावंत आदी उपस्थित होते.