एखाद्या फाटक्या माणसासमोर नतमस्तक होईन, पण पदासाठी हात पसरण्याचे संस्कार रक्तात नाही – पंकजा मुंडे…

28

बुलढाणा/प्रतिनिधी:-

एखाद्या फाटक्या माणसासमोर नतमस्तक होईन, लोकांच्या दहा परिक्रमा करेन. पण कुठल्या पदासाठी कुणासमोर हात पसरविण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाही असं भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. पंकजा मुंडेंची खदखद पुन्हा एकदा समोर आली. बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथील एका कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. दुसरबीड येथे शनिवारी माजी आमदार तोताराम कायंदे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त पंकजा मुंडे यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या की, “माझे माता-पिता, माझे सर्वस्व तुम्ही आहात, तुम्हाला दहा परिक्रमा मी करेन. अजून कुठल्या परिक्रमेची मला गरज नाही. एखाद्या गरीब फाटक्या माणसासमोर, त्याच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक होईन. पण कुणासमोर हात पसरून कोणत्या पदाची मागणी करण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत. एखादी संधी मिळाली नाही तरी चालेल, पण लोकांच्या सेवेची संधी मी सोडणार नाही.” असं त्यांनी म्हटलं आहे.