मतदार जागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा:-डॉ. दिलीप पांढरपट्टे

31

सिंधुदुर्गनगरी/प्रतिनिधी

46 – रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी 23 एप्रिल 2019 रोजी मतदान होत आहे. या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढावी, सर्वांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊ नमतदान करावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या मतदार जागृतीच्या उपक्रमात सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे तसेच स्विप च्या सह अध्यक्षा तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी संयुक्त रीत्या केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नुतन सभागगृहात आयोजित बैठकीत स्विप म्हणजे सिस्टिमॅटीक व्होटर्स एज्युकेशन ॲण्ड इलेक्ट्रोल पार्टिसिपेशन प्रोग्रामची आढावा बैठक झाली.या बैठकीस अप्पर पोलीस अधिक्षक निमित गोयल, उप जिल्हा निवडणूक अधिकारी जयकृष्ण फड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, कमलाकर रणदिवे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक शिंदे, जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. शिवप्रसाद खोत, शिक्षणाधिकारी माध्यमिक अशोक कडूस, शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री. एकनाथ आंबोकर, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक संचालक जयंत चाचरकर, तसेच खाते प्रमुख, नोडल ऑफिसर, नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

नव मतदार, वयोवृद्ध व्यक्ती, दिव्यांग मतदार महिला – पुरुष आदींनी मोठ्या संख्येने मतदानासाठी यावे यासाठी कुडाळ, कणकवली, सावंतवाडी विधानसभा मतदार संघ निहाय तालुका मुख्यालये, महत्वाची शहरे येथे रॅली, मोटार सायकल रॅली आयोजित कराव्यात, वेंगुर्ला, देवगड व मालवण नगरपालिका मुख्याधिकारी यांनी सागर किनाऱ्यावर सागरी दौड आयोजित करावी, सागर किनाऱ्यावर मतदार जागृतीसाठी स्थानिक कलाकारांकडून वाळू शिल्पे करावीत, दशावतर या लोककलेच्या माध्यमातून मतदार जागृती करावी, सर्व शासकीय कार्यालयामधून व परिसरात बॅनर्स लावावीत, गतवर्षी ज्या मतदान केंद्रावर मतदान कमी झाले आहे अशा ठिकाणी जागृती मोहीम प्रभावीपणे राबवावी आदी सूचना डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी दिल्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप समितीच्या सह अध्यक्षा के.मंजूलक्ष्मी यांनी आतापर्यंत स्वीप अंतर्गत झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. ट्वीटर, फेसबूक, इन्स्टाग्राम, व्हॉट्स ॲप या समाजमाध्यमातून स्वीपच्या कार्यवाहीचे अपडेशन सातत्याने व दैनंदिन व्हावे, रॅलेचे आयोजन सध्याचा उन्हाळा पाहता सकाळी 11 पूर्वी करावे, शहरातील तसेच मोठ्या गावात साईन वॉल हा उपक्रम हाती घ्यावा आदी सूचना यावेळी केल्या.

प्रारंभी समन्वय अधिकारी संतोष जिरगे यांनी पी.पी.टी.च्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या व संपन्न झालेल्या उपक्रमांची माहिती दिली.