मोदी इतरवेळी ठिकठाक, निवडणूक आली की त्यांच्या अंगात येतं : पवार

बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी इतरवेळी ठिकठाक असतात, मात्र निवडणुका आल्या की त्यांच्या अंगात येतं, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष आमि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंडमध्ये कन्या सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आले होते. दौंड तालुक्यातील पाटस येथे शरद पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला

“पंतप्रधान वर्ध्याला आले आणि माझ्यावर टीका केली. त्यांनी आमच्या घरात भांडण आहेत म्हटलं. आमचं कुटुंब आजही सर्वांचा विचार घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतंय. पण ज्यांना कुटुंबच नाही, त्यांना कुटुंबात काय चालतं हे कसं कळणार? ज्यांना कुटुंब नाही त्यांनी दुसऱ्याच्या कुटुंबाची काळजी करण्याचं कारण नाही.” असे शरद पवार म्हणाले.
“यापूर्वी नरेंद्र मोदी अनेकदा म्हणालेत की माझं बोट धरुन राजकारण शिकलो. पण निवडणुका आल्या की ते आपल्यावर टीका करतात. दौंडकरांनो आपण कुणावरही व्यक्तिगत टीका करु नका. सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर व्यक्तिगत टीका करण्याची जबाबदारी आहे.” असे म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला.