सिंधुदुर्गात चोरट्यांचा धुमाकूळ अजूनही सुरुच; फोंडा बाजारपेठेत चोरी…

46

कणकवली/प्रतिनिधी:-

जिल्ह्यातील वैभवाडी, खांबाळे, तळेरे बाजारपेठेनंतर चोरट्यांनी आपला मोर्चा फोंडाघाट बाजारपेठेत वळवला. तेथील दोन दुकानेही त्‍यांनी फोडली मात्र आत रोकड नसल्‍याने चोरीचा प्रयत्‍न असफल ठरला. त्‍यानंतर अजित नाडकर्णी यांचे बंद घर फोडल जात असताना स्थानिक घरातून बाहेर आले, त्‍यामुळे चोरटे तेथून पसार झाले.

फोंडाघाट बाजारपेठेतील केदार कोल्ड्रिंक, प्रदीप तावडे यांचे किराणा दुकान शटर उचलून चोरट्यांनी फोडले. मात्र आत रोख रक्‍कम न मिळाल्‍याने चोरट्यांनी तेथील अजित नाडकर्णी यांचे घर फोडण्याचा प्रयत्‍न सुरू केला. कडी कोयंडा तोडण्याचा आवाज ऐकल्‍यानंतर तेथील नागरिक महेश पेडणेकर यांनी स्थानिकांना याबाबतची माहिती दिली. यात नागरिकांच्या आवाजाने चोरटे तेथून पसार झाले. याा चोरट्यांचा पाठलाग संतोष टक्के, महेश पेडणेकर रमेश राणे आदींनी केला. मात्र चोरटे तेथून पसार झाले. दरम्‍यान अजित नाडकर्णी यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेराही चोरट्यांनी पळवला आहे. तत्पूर्वी मंदिराच्या मागे पवार यांचे घर कोणी नसल्याने चोरांनी फोडले होते.

चोरट्यांच्या उपद्रवामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. रात्री दोन ते चार या दरम्‍यान वाजता पोलिसांकडून गस्त घालण्याची आग्रही मागणी नागरिकांतून होत आहे.

दरम्‍यान स्टेट बँक आणि बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा असलेल्‍या ठिकाणचा टुलबॉक्‍स उघडा असल्याने, यात चोरटयांनी छेडछाड केल्याचा संशय व्यक्त होत आहे, तर चोरटे चोरी पूर्वी माहिती घेऊनच चोरी करत असल्याचे, घटनाक्रमावरून स्पष्ट होत आहे.