वीज वितरणचे प्रधान तंत्रज्ञ गणेश पाटेकर यांचा उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी पुरस्काराने सन्मान…

9

वैभववाडी/प्रतिनिधी:-

वैभववाडी वीज वितरण कंपनीमध्ये प्रामाणिक व कर्तव्यदक्षपणे सेवा बजावणारे प्रधान तंत्रज्ञ गणेश अनंत पाटेकर यांना वीज वितरणचा उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड यांच्या वतीने हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. पुरस्कारप्राप्त गणेश पाटेकर यांचे वैभववाडी तालुक्यात अभिनंदन केले जात आहे.

गणेश पाटेकर हे पाचल ता. राजापूर येथील रहिवाशी आहेत. परंतु गेले अनेक वर्ष ते वैभववाडी तालुक्यात वास्तव्यास आहेत. 2006 मध्ये ते वीज वितरण कंपनीत नियुक्त झाले. सुरुवातीला त्यांनी वैभववाडी उपविभागीय कार्यालयात वीज सेवक म्हणून सेवा बजावली. सद्या ते सेक्शन एक मध्ये प्रधान तंत्रज्ञ या पदावर कार्यरत आहेत.

अचानक उद्भवणाऱ्या तांत्रिक स्वरूपाच्या समस्या तातडीने सहकार्‍यांच्या मदतीने सोडविणे, विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणे, ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देणे आदी कर्तव्य बजावण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यांच्या कर्तव्यदक्ष कार्याची दखल घेत कंपनीने त्यांना पुरस्कार देऊन गौरविले आहे. पुरस्कार वितरण सोहळा रत्नागिरी येथील कोकण परिमंडळ मंडळ कार्यालय या ठिकाणी पार पडला. यावेळी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त कर्मचारी उपस्थित होते.

पुरस्कार प्राप्त गणेश पाटेकर यांना रत्नागिरी परिमंडळाचे मुख्य अभियंता विजय भटकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी औद्योगिक मुख्य अभियंता श्री पाटील, वरिष्ठ लिपिक श्री, पावसकर व कर्मचारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्यानंतर गणेश पाटेकर यांचे वैभववाडीचे उपकार्यकारी अभियंता कृष्णात सूर्यवंशी यांनी अभिनंदन केले. तसेच त्यांचे वीज कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून देखील अभिनंदन केले जात आहे.