विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात स्पर्धा स्वतःशीच करावी – सुरजकुमार कांबळे…

7

वैभववाडी/प्रतिनिधी:-

प्रत्येक विद्यार्थ्याने थोर समाजसुधारकांचे कार्य वाचले पाहिजे. वाचनात सातत्य ठेवले पाहिजे. शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी स्पर्धा स्वतःशी केली पाहिजे. असे प्रतिपादन वाभवे – वैभववाडी नगरपंचायतचे मुख्याधिकारी सुरजकुमार कांबळे यांनी व्यक्त केले.

दत्त प्रगती कला, क्रीडा मंडळ करूळ गावठण व शाळा व्यवस्थापन समिती गावठण अ यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग कार्यक्रम वि.मं. गावठण अ प्रशालेत पार पडला. यावेळी व्यासपीठावर वैभववाडी पं.स. चे गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, केंद्रप्रमुख श्री. गोसावी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष साची कोलते, पं.स. माजी सदस्य बाळा कदम, तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र पवार, दत्ताराम साटम गुरुजी, राजेंद्र गुरव, शरद सावंत, बबन सावंत, शरद कोलते, चंद्रकांत कोलते, हिराचंद कोलते, यशवंत कोलते, ग्रामसेवक शशिकांत गुरव, मुख्याध्यापक नवनाथ सगरे, शिक्षिका ताई व्हनाले, सर्व शाळेचे शिक्षक व मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुरजकुमार कांबळे म्हणाले, दहावी व बारावीत कमी मार्क असलेला विद्यार्थी देखील जिद्द व चिकाटीच्या जोरावर अधिकारी होऊ शकतो. जे कराल ते प्रत्येकाने मनापासून केले पाहिजे. मोबाईलचा वापर ठराविक काळासाठी केला पाहिजे. शालेय जीवनात मैदानी खेळाकडे दुर्लक्ष नको. मैदानी खेळ खेळलेच पाहिजे असे सांगितले. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून विनम्र वागले पाहिजे. माहिती गोळा करणे व वाचन क्षमता प्रत्येकाने वाढवली पाहिजे. वर्तमान पेपर मधील जे काही आवडतं ते प्रत्येकाने वाचलं पाहिजे असे सांगितले.

मुकुंद शिनगारे म्हणाले, स्पर्धेत टिकण्यासाठी स्वतःमध्ये आत्मविश्वास वाढला पाहिजे. कितीही संकटे, अडचणी येऊ द्या डगमगू नका, खचून जाऊ नका. जिद्द, चिकाटी व परिश्रम यामध्ये सातत्य ठेवा, यश निश्चित तुमच्याकडे येईल.

घरात वीज नसलेले देखील काही विद्यार्थी अधिकारी झाले आहेत. गरिब विद्यार्थीही अधिकारी होऊ शकतो असे सांगितले. शालेय जीवनापासूनच प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उतरले पाहिजे. प्रत्येक स्पर्धेत भाग घेतला पाहिजे. अपयश आले तरी खचून जाऊ नका. प्राथमिक शाळांमध्ये स्पर्धा परीक्षेची बीजे रोवली जात आहेत. याचे समाधान वाटते. आदर्श गाव, जागॄत पालक असे उपक्रम राबवू शकतात असे सांगितले. रवींद्र पवार, एम. एन. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सुस्वर आवाजात स्वागतगीत सादर केले. प्रमुख वक्ते सुरजकुमार कांबळे व मुकूंद शिनगारे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शाळा व्यवस्थापन अध्यक्ष साची सचिन कोलते यांचाही मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती व दत्त प्रगती मंडळातील सभासदांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मुख्याध्यापक नवनाथ सगरे यांनी मानले.