आनंदीबाई रावराणे महाविद्यालयामध्ये महाराणा प्रतापसिंह जयंती साजरी…

वैभववाडी/प्रतिनिधी:-

आज दिनांक ९ मे रोजी आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी येथे मेवाड अधिपती महाप्रतापी, अद्वितीय योध्दा महाराणा प्रतापसिंह यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे स्थानिक अध्यक्ष श्री. सज्जनकाका रावराणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच सज्जनकाका रावराणे, प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे, उपप्राचार्य श्री. ए.एम. कांबळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.एम. आय. कुंभार आणि विद्यार्थी प्रतिनिधी प्रथमेश साळुंखे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी सज्जनकाका रावराणे म्हणाले की, महाराणा प्रतापसिंह हे रावराणे समाजाचे आराध्य दैवत असून या समाजाला त्यांचे विचार व शौर्य यांचा वारसा लाभला आहे. तर प्राचार्य डॉ. काकडे यांनी महाराणा प्रतापसिंह व शाहू महाराज या दोन युग पुरुषांची जयंती संयुक्तपणे दरवर्षी साजरी करुन त्यांचे विचार,शौर्य व कार्यकर्तुत्व विद्यार्थ्यांपर्यंत पोचवितो असे सांगितले. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. एम. आय. कुंभार यांनी सांस्कृतिक विभागामार्फत महाराणा प्रतापसिंह, छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराज यांसारख्या युगपुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे विचार,आचार, संस्कार, अलौकिक कर्तुत्व, शौर्य महाविद्यालयातील युवकांच्या मनावर बिंबवण्याचे सदैव प्रयत्न केले जातात असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाला महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे स्थानिक अध्यक्ष मा. सज्जनकाका रावराणे, प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे, उपप्राचार्य श्री. ए.एम. कांबळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.एम.आय. कुंभार, महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीआणि विद्यार्थी उपस्थित होते.