मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडली विठुरायाची महापूजा…

8

पंढरपूर/प्रतिनिधी:-

आज आषाढी एकादशी आहे. याच निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपुरात विठुरायाची महापूजा पार पडली. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची ही महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही पहिलीच महापूजा पार पडली आहे. पहाटे 3 वाजून 10 मिनिटांनी ही शासकीय महापूजा पार पडली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई गावच्या मुरली बबन नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई मुरली नवले या शेतकरी दाम्पत्याला विठुरायाच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला आहे. गेली 20 वर्ष शेती करून आपल्या कुटुंबाला सांभाळणाऱ्या नवले कुटुंबात 1987पासून वारीची परंपरा सुरु आहे. मुरली नवले हे दरवर्षी न चुकता सलग वारी करत आहेत. तसेच, ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातही गेल्या 12 वर्षांपासून पायी वारी करत आहेत.