प्रत्येक पक्षाला ऊन-सावली असतेच, पंकजा मुंडे भाजपा सोडणार नाहीत…

22

मुंबई/प्रतिनिधी:-

राज्यात भाजपा सरकार आल्यापासून पुन्हा एकदा मुंडे समर्थकांनी पंकजा मुंडे यांची मंत्रिपदावर वर्णी लागावी अशी मागणी केली आहे.

परंतु मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात पंकजा मुंडे यांना स्थान न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज झाले. पंकजा मुंडे यांना सुरुवातीला विधान परिषद उमेदवारी आणि आता मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा सातत्याने पुढे येत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली आहे. याच दरम्यान आता राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी यावर भाष्य केलं आहे.

“प्रत्येक पक्षाला ऊन-सावली असतेच, पंकजा मुंडे भाजपा सोडणार नाही” असं म्हटलं आहे. महादेव जानकर यांनी आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. रासपने कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी यापूर्वीच केली असल्याचे जानकर म्हणाले. तसा प्रस्ताव देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला असल्याचं सांगितलं. पंकजा मुंडे यांच्या पक्ष नाराजीच्या चर्चेवर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. प्रत्येकच पक्षाला ऊन-सावली असते. गोपीनाथ मुंडे यांचे संपूर्ण आयुष्य भाजपामध्ये गेले आहे, पंकजा मुंडे यांनी देखील पक्षासाठी मेहनत घेतली आहे, त्यामुळे त्या भाजपा सोडून दुसऱ्या पक्षात जाणार नाहीत” असं जानकर यांनी म्हटलं आहे.

अमोल मिटकरी म्हणाले की, एकनाथ खडसे, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्यांनी भाजपा वाढवला. परंतु ज्यारितीने तिकीट द्यायचं आणि त्यांनाच पाडायचं सूडाचं राजकारण भाजपानं केले. ते रोहिणी खडसेंच्या लक्षात आले. पंकजा मुंडे यांच्याही ते लक्षात आले पाहिजे. आपल्या पक्षाला वाढवण्याचं प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांचे पंख कसे छाटतात. तुमच्या पक्षात तुम्हाला भाजपा बाजूला कसं ठेवतंय हे तुम्ही ओळखणं गरजेचे आहे असं सांगत मिटकरींनी अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली.

गोपीनाथ मुंडे हे वेगळ्या पक्षात असले तरी त्यांची महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात वेगळी ओळख आहे. आमचे अनेक वर्षांचे संबंध होते. जरी विरोधक असला तरी वैयक्तिक संबंध पाळले पाहिजे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. परंतु आता कटुता वाढताना दिसते हे दुर्देवी आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. जर मिटकरींनी चांगला विचार मांडला असेल तर पक्ष जरूर त्याचा विचार करेल. पंकजा मुंडे कुठल्याही पक्षात राहिल्या तरी त्यांच्या कुटुंबीयांना माझ्या शुभेच्छा आणि प्रेम कायम असेल असं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.