फोंडाघाट चोरीतील आरोपीला कर्जतमधून अटक

16

कणकवली : फोंडाघाट खैराटवाडी येथील स्वत:च्याच घरात २ लाख ४० हजारांची चोरी करून पसार असलेला संशयित आरोपी लक्ष्मण पांडुरंग खरात याला गुन्हा अन्वेषण शाखेने कर्जत-नेरळ येथून ताब्यात घेतले आहे. त्याने स्वत:च्या घरात तिसऱ्या वेळी चोरी केल्याने वडील पांडुरंग खरात यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

या तक्रारीनुसार अटकेची कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने केली. त्याला कणकवली पोलिसांनी बुधवारी न्यायालयात हजर केले असता २६ जुलैपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

फोंडाघाट-खैराटवाडी येथील आपल्या घरात बनावट चावी वापरून सोने व रोख रक्कम असा २ लाख ४० हजारांचा ऐवज लक्ष्मण खरात याने चोरला होता. चोरी केल्यानंतर त्याने पोबारा केला होता. कणकवली पोलीस ठाण्यात या चोरट्याविरोधात गुन्हा दाखल होता. सिंधुदुर्ग जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखेकडून आरोपीच्या मागावर पथक रवाना करण्यात आले होते. त्या पथकाने लक्ष्मण याला २३ जुलै रोजी कर्जत येथे पकडले. त्याच्याकडून रोख ९५०० रुपये व तसेच त्याने लपवून ठेवलेले १ लाख १७ हजारांचे दागिने घरात आढळून आले. हा मुद्देमाल कणकवली पोलिसांनी जप्त केला आहे.

उर्वरित रक्कम आरोपीने खर्च केल्याची प्राथमिक माहिती आहे. लक्ष्मण खरातला न्यायालयात हजर केले असता २६ जुलैपर्यंत ३ दिवसांची कोठडी मिळाली आहे. याबाबतचा अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत. ही अटकेची कारवाई गुन्हा अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शाहू देसाई, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक खंदारे, पोलीस कॉन्स्टेबल गुरु कोयंडे, कांदळगावकर आदी पोलिसांच्या पथकाने केली आहे.