शाह, मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू लवकरच योग्य निर्णय घेऊ!

17

स्वाभिमान पक्षाच्या बैठकीत नारायण राणेंचे वक्तव्य : राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता

वार्ताहर / कणकवली:

येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. तसे संकेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीतून देण्यात आल्याचे समजते. मात्र, जिल्हय़ासह राज्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे या बैठकीत अद्याप कोणताही अंतिम निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. ‘भाजप पक्षाध्यक्ष अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझी चर्चा सुरू असून लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल’ असे सुतोवाच स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी या बैठकीत केल्याचे समजते. त्यामुळे आता नारायण राणेंच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक रविवारी ओसरगाव येथील महिला भवनात झाली. काँग्रेसचे आमदार नीतेश राणे, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जि. प. अध्यक्षा संजना सावंत, सुदन बांदिवडेकर, अशोक सावंत, रणजीत देसाई, डॉ. मिलिंद कुलकर्णी, बाळू कुबल यांच्यासह जिल्हय़ातील स्वाभिमानचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत काहीतरी महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता गेले काही दिवस वर्तविण्यात येत होती. तशी चर्चाही राजकीय गोटात गेला महिनाभर सुरू होती. मात्र, स्वाभिमान पर्यायाने नारायण राणेंनी आपल्या पुढील राजकीय वाटचालीचा ‘सस्पेन्स’ कायम ठेवला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत स्वाभिमान स्वतंत्र लढणार की, भाजपकडून मित्रपक्ष म्हणून निवडणूक लढणार, नारायण राणे पुन्हा निवडणूक रिंगणात उतरणार का? कुडाळ-मालवण व सावंतवाडी मतदारसंघात स्वाभिमानचा उमेदवार कोण असणार? कणकवली मतदारसंघात नीतेश राणे उमेदवार असणार, की ते अन्य मतदारसंघ निवडणार? याकडे स्वाभिमानच्या पदाधिकाऱयांसह विरोधकांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, या बैठकीत केवळ राजकीय सुतोवाच करण्याव्यतिरिक्त राणे यांनी कोणताही महत्वाचा निर्णय जाहीर केला नसल्याचे समजते. भाजप पक्षाध्यक्ष व मुख्यमंत्र्यांसोबत माझी चर्चा सुरू असल्याचे सांगत राणेंनी आपली पुढील राजकीय वाटचालीची उत्सुकता मात्र ताणली आहे.

बैठकीत काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनीही तुमच्यासारखी मलाही आजच्या बैठकीची उत्सुकता आहे, असे सांगत विधानसभेच्या निवडणुकीबाबत सस्पेन्स बाळगला आहे. गेले काही दिवस नीतेश राणे भाजपचे उमेदवार असतील, अशा चर्चा सुरू आहेत. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या सतीश सावंत व दत्ता सामंत यांच्यापैकी कोणाला उमेदवारी मिळते, की कुडाळ-मालवणमध्ये अन्य कुणी नवीन चेहरा समोर येतो, यासाठी अजून काही काळ वाट पाहवी लागणार आहे.