आपद्ग्रस्तांना सावरण्यासाठी शिवसेना नेहमीच पुढे असेल

20

आदित्य ठाकरेंकडून पूरग्रस्तांची विचारपूस : झोळंबेत व्यासपीठ नाकारत ग्रामस्थांसोबत सहभाग

प्रतिनिधी / दोडामार्ग:

कोकणात पूरस्थितीने झालेले नुकसान डोळय़ात पाणी आणणारे आहे. त्यामुळे आपण कोकणात आपद्ग्रस्तांच्या भेटीला आलो आहे. मदतद्देत असतांना व्यक्ती कोणत्या पक्षाची आहे, ते महत्वाचे नाही. पक्ष, जात-पात, धर्म विसरून पक्षाकडून प्रत्येकाला मदत दिली जाईल. जर कोणी मदतीपासून वंचित असेल तर शिवसेनेच्या पदाधिकाऱयांना सांगा. आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली.

दोडामार्ग तालुक्यात ठाकरे यांनी आपत्कालीन स्थितीची पाहणी केली. मणेरी येथून झोळंबेत त्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख संजय पडते, आमदार वैभव नाईक, माजी आमदार सचिन अहिर, तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, उपजिल्हाप्रमुख गणेशप्रसाद गवस, उपजिल्हा संघटक गोपाळ गवस, सभापती संजना कोरगावकर, नगराध्यक्षा लीना कुबल, युवासेना तालुकाप्रमुख भिवा गवस, तालुका संघटक संजय गवस, उपतालुकाप्रमुख भगवान गवस यांच्यासह पदाधिकारी, जि. प., पं. स. सदस्य उपस्थित होते.

कायमस्वरुपी मार्ग काढू – ठाकरे

  आदित्य ठाकरे म्हणाले, सुरुवातीला पाऊस पडू दे, अशी प्रार्थना होत होती. मात्र, आता प्रचंड पाऊस कोसळल्याने आपत्तीला सामोरे जावे लागले. धान्य, कपडे, भांडी, रोख स्वरुपात मदत दिली आहे. शासनाबरोबरच शिवसेनाही या पूरबाधितांना मदत करत आहे. असे असले तरी पुन्हा मोठा पाऊस झाला तर अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी तज्ञांशी बोलणे सुरू आहे. यावर उपाययोजना केल्या जातील.

झोळंबेच्या दापटेवाडीचे होऊ शकते पुनर्वसन

  पालकमंत्री केसरकर म्हणाले, झोळंबे (दापटेवाडी) येथील डोंगर खचून झालेल्या नुकसानीनंतर येथील 12 कुटुंब विठ्ठल मंदिरात आहेत. असे असले तरी मंदिरात राहताना अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे घरभाडे देणे, शासकीय जागा उपलब्ध करून घरे बांधून देणे विचाराधीन आहे. प्रथम भूगर्भ शास्त्रज्ञांच्या अहवालानुसार पुनर्वसन करावे, असे सूचविले असले तरी ‘ड्रील’ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पुन्हा तपासणी करून अहवाल घेतला जाईल. त्यानंतर पुनर्वसन पर्याय असेल तर तो ग्रामस्थांना स्वीकारावा लागेल. मात्र, ग्रामस्थांनी आमचे पुनर्वसन नको. संरक्षक भिंत बांधा, अशी मागणी केली. त्याला केसरकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

ठाकरे झाले भावूक

  झोळंबेतील खचलेला डोंगर व बागायती, घरांचे नुकसान याची पाहणी आदित्य ठाकरे यांनी केली. त्यानंतर त्यांनी झोळंबेवासीयांशी संवाद साधण्यासाठी मंदिरात
प्रवेश केला. विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले. बाजूला त्यांच्यासाठी व्यासपीठ बनविण्यात आले होते. समोर ग्रामस्थ बसले होते. मात्र, भावूक झालेल्या ठाकरे यांनी व्यासपीठावरील खुर्चीवर न बसता पायरीवर इतर ग्रामस्थांसारखे बसणे पसंद केले. तसेच ग्रामस्थांशी चर्चा केली.

खासदारांचा मालवणीतून संवाद

  खासदार राऊत यांनी झोळंबेवासीयांशी मालवणी भाषेतून संवाद साधायला सुरुवात केली. ते मधूनच मराठीतून बोलत असताना ठाकरे यांनी तुम्ही मालवणीतच बोला. मला समजते आणि ऐकायला आवडते, असे सांगितले. खासदारांनी शेवटपर्यंत मालवणीतून संवाद साधला आणि हा संवाद ग्रामस्थांच्या
हृदयाला भिडलाही.